उघड्यावरील मांस विक्री बंद करा!
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांलगत उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. मांस विक्री करण्यापूर्वी मनपाच्या आराेग्य अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करणे भाग आहे तसे हाेत नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.
दुर्गा चाैकात नाला तुंबला
अकाेला: मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या दुर्गा चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी तसेच हाॅस्पिटलमध्ये येणारे रूग्ण त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाई करण्याची गरज असून यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
अकाेला: जुने शहरातील शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकापर्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम करण्यात आले. यावेळी उजवणे शाळेच्या काेपऱ्यावर खाेदण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला नसून यामुळे दुचाकीचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे.
मनपाचे आराेग्य निरीक्षक सुस्तावले
अकाेला: शहराच्या कानाकाेपऱ्यांत हाेणाऱ्या साफसफाइच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
पथदिवे सुरू करा!
अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून ही समस्या दुर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
सांडपाणी तुंबले;नागरिक त्रस्त
अकाेला: प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या गंगानगर परिसरात नाल्यांची नियमित साफसफाई हाेत नसल्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यांवर साचले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून प्रभागातील नगरसेवक फिरकूनही पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.
ओपन स्पेसमधये अति्क्रमण
अकाेला: शहरात ले-आऊटचे निर्माण करताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवणे भाग आहे. बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे लहान मुलांची कुचंबणा हाेत आहे. वयोवृध्द नागरिक, लहान मुलांसाठी अशा खुल्या जागा विकसीत करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.