अकाेला : प्रशासनाने मिनी लाॅकडाऊनच्या नावाखाली संपूर्ण लाॅकडाऊनच लावले आहे. काेराेना प्रतिबंधासाठी निर्बंध घाला, मात्र अशा प्रकारे लाॅकडाऊन करून व्यापार ठप्प करू नका, अन्यथा आमचा सयंम संपेल, अशा शब्दांत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला. तसेच सध्याच्या लाॅकडाऊनबाबत राेष व्यक्त केला. जिल्हा नियाेजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, तसेच अन्य अधिकाऱ्यांसह विदर्भ चेंबर ऑफ कामर्सचे नितीन खंडेलवाल, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाेहरे , वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, मनाेहर पंजवाणी, जय बुलानी, रवी लक्षवाणी, मनिष टकराणी, राजाराम अहेर, अनिल परयानी, बाहेती आदींसह व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
.........................
अशा व्यक्त झाल्या भावना
नितीन खंडेलवाल
लाॅकडाऊनमुळे अर्थचक्र ठप्प झाले. आमचा संयम संपला, लाॅकडाऊन मागे घ्या अन्यथा साेमवारपासून आम्ही सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करू.
प्रकाश पाेहरे
लाॅकडाऊन काळात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे. लाॅकडाऊन मागे न घेतल्यास दुकाने सुरू केली जातील.
डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर
काेराेनाच्या धास्तीने लाेकांनी लाॅकडाऊन मान्य केला. या काळात आराेग्य सेवा सुधारली नाही, मात्र लाॅकडाऊनमुळे सामान्य जनतेचे हाल झाले. लहान-माेठे व्यापारी अडचणीत आले. आता तरी लाॅकडाऊन परत घ्या अन्यथा दाेन दिवसांत रस्त्यावर उतरून लाॅकडाऊन माेडून काढू.
बाॅक्स..
निर्बंधांचे पालन करून व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे!
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावले असून, या निर्बंधांचे पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यामुळे निर्बंधांचे पालन करून व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी केले.