अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना फुप्फुसांशी निगडित फायब्रोसिस आजाराची लक्षणे समोर आली आहेत. यासोबतच रुग्णांमध्ये हृदयाशी निगडित तक्रारीदेखील येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाचे ठोके कमीअधिक होणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, धाप लागणे आदी सामान्य तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे आढळताच रुग्णांनी तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावा, असे आवाहन सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत ५०च्या जवळपास रुग्णांनी पोस्ट कोविड उपचार घेतले आहेत. यातील बहुतांश रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळली आहेत. याचसोबत काही रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित लक्षणेही दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कोविडच्या संसर्गाचा शरीरातील फुप्फुस, किडनी, लिव्हर, हृदय यासह इतर अवयवांवर परिणाम होतो. आधीच दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांवर तसेच तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर परिणामांची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतर वैद्यकीय सल्ल्याने योग्य उपचार, व्यायाम आणि आहार घेऊन हृदयाची धडधड सांभाळा असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
अनेकांची कार्यक्षमता होते कमी
सर्वोपचार रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मते कोरोनामुक्तीनंतर अशक्तपणा जाणवणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची कार्यक्षमता कमी होत असल्याने प्रतिकारशक्ती विकसित होण्यास कालावधी लागतो. त्यामुळे अनेकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. यावर वैद्यकीय सल्ला, पुरेशी विश्रांती, व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे.
ही लक्षणे ओळखा
कोरोनातून बरे झाल्यानंतर चालताना दम लागणे, छातीत दुखणे, चक्कर येणे, जीव घाबरणे आदी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे हृदयरोगाशी निगडित असू शकतात. त्यामुळे परस्पर औषधोपचार न करता, तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येते.
कोरोनातून बरे झालेल्या व पोस्ट कोविड तपासणी केलेल्या काही रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळत आहेत. याशिवाय रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित तक्रारीही समोर येऊ शकतात. कोरोनानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, औषध वैद्यकशास्त्र विभाग, जीएमसी