अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना संक्रमण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली. उपाययोजनांसंदर्भात अकोला शहरातील नामवंत बालरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून, या लाटेत १८ वर्षांखालील बालके आणि युवकांना कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १६ एप्रिल रोजी अकोला शहरातील नामवंत बालरोगतज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके व युवकांना संक्रमणाच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी तातडीने उपचार होण्याकरिता करावयाच्या उपाययोजनासंदर्भात बालरोगतज्ज्ञांनी सूचना मांडल्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली. तातडीने करावयाच्या उपाययोजनासंदर्भात सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर निवेदनाद्वारे मांडल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, डॉ. प्रसन्नजित गवई आदी उपस्थित होते.
उपाययोजनांसाठी अशा मांडल्या सूचना!
अकोल्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्णतः १८ वर्षापर्यंत वयोगटातील कोरोना संक्रमित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावे, नवजात बालकांसाठी एनआरएचएम अंतर्गत प्रत्येक केंद्रात दहा बेड राखीव ठेवून तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, बालकांसोबत असलेल्या आईला स्तनपानासाठी प्रत्येक केंद्रावर वेगळा कक्ष उपलब्ध करावा व सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी, जिल्ह्यातील प्रत्येक शहर व तालुक्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, प्रत्येक रुग्णालयास कोरोना रुग्ण दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी, कोविडसाठी विशेष रुग्णालयाची व्यवस्था न ठेवता सर्व खासगी डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, म्युकरमायकोसिसकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वेगळा वाॅर्ड तयार करण्यात यावा, प्रत्येक तालुकास्तरीय आरोग्य केंद्र, शासकीय व खासगी रुग्णालयांत किती बेड्स, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे याची नागरिकांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यावी, व्हेंटिलेटर्स तातडीने खरेदी करण्यात यावे, कोरोनाग्रस्त बालक व युवकांवर उपचाराची एकच पद्धत असावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालरोग व इतर तज्ज्ञांचा समावेश आलेल्या टास्क फोर्सचे गठन करण्यात यावे, संक्रमित बालकांसाठी सकस आहार उपलब्ध करावा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक्स-रे मशीन, रुग्णवाहिका व आवश्यक किट उपलब्ध करून देण्यात यावी, जिल्ह्यात टेलिमेडिसिन सुविधा सुरू करावी व बालकांच्या लसीकरणासाठी बालरोगतज्ज्ञांना परवानगी देण्यात यावी.