अकोला: जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा होण्याच्या घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे सांगत, फवारणीसाठी शेतकरी व शेतमजुरांना लागणारे संरक्षक किट ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांना लागणारी संरक्षक किट खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदान थेट वितरित करण्याचे सांगत, जिल्हा परिषद सेस फंडातून पाचशे रुपयांचे संरक्षक साहित्य खरेदी करणाºया शेतकरी व शेतमजुरांच्या बँक खात्यात ९० टक्के अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकºयांना विषबाधा झाल्याच्या घटनांची माहिती जिल्हास्तरावर पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या क्रमांकावर तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कीटकनाशक फवारणीसाठी शेतकºयांनी हाताने चालविल्या जाणाºया नियंत्रित दाबाच्या पंपाचा वापर करण्याचे आवाहन करीत, कीटकनाशक विक्रेत्यांनी शेतकºयांना कीटकनाशके विक्री करताना, शिफारशीच्या प्रमाणातच कीटकनाशके द्यावीत, त्याव्यतिरिक्त कीटनाशके दिल्यास कारवाई करण्यात येणार असून, प्रतिबंधित व अवैध औषध विक्रीसंदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना यावेळी दिले.विषबाधित शेतकºयांची पालकमंत्र्यांनी केली विचारपूस!पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात जाऊन विषबाधित शेतकºयांच्या प्रकृतीची विचारपूस केली व उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व संबंधित अधिकारी अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील विषबाधित २६ शेतकºयांवर उपचार सुरू!कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा शेतकºयांपैकी जिल्ह्यातील २६ शेतकºयांवर सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी आढावा बैठकीत दिली.