अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी पोलीस, महसूल व आरोग्य विभागाने समन्वय साधून उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार, श्रीकांत देशपाडे, अभयसिंह मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा भागात निर्बंध अधिक कडक करून, गावातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करण्याचे सांगत, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करण्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, सरपंच, शिक्षक यांच्या मदतीने पथके तयार करून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती व कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते उपचार सुरू आहेत की नाही, याबाबत खातरजमा करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.