भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी माफी मागावी!
अकाेला : महिला दिनाच्या दिवशी काॅंग्रेस नेते भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी स्वत: ट्रॅक्टरवर बसून ताे ट्रॅक्टर महिलांना ओढायला लावला हाेता. स्त्री शक्तीचा अपमान करून त्यांना अमानवी वागणूक देणाऱ्या भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्यावतीने गुरूवारी सुहासिनी धोत्रे, कुसुम भगत, चंदा शर्मा, अर्चना शर्मा यांनी केली आहे.
भाजपतर्फे संभाजीराजेंना आदरांजली
अकाेला : छत्रपती संभाजीराजे भाेसले यांच्या बलिदान दिनी भाजपतर्फे विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. संभाजी महाराज यांनी धर्मरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राष्ट्रभक्ताने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
जि. प.मध्ये अधिकारी सापडेना !
अकाेला : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना संबंधित अधिकारी जागेवर सापडत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे प्रलंबित विषय कायम राहात आहेत. दालनातील पदाधिकारीही याेग्यरित्या समाधान करत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार्किंगला खाे!
अकाेला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, पार्किंगचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडूनच नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या परिसरात वाहने ठेवताना शिस्तीचे पालन हाेत नसल्याचे चित्र आहे.
मिनी हायवेची दुरूस्ती रखडली!
अकाेला : शिवनी ते नेहरू पार्क चाैक ते खदान पाेलीस ठाणे ते थेट बाबासाहेब धाबेकर फार्महाऊसपर्यंत निर्माणाधिन मिनी हायवेच्या कामाची गती मंदावली आहे. सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण हाेत असताना वाशिम बायपास चाैक, जनावरांचा बाजार, मानव शाेरूम तसेच निमवाडी चाैकात रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
डाबकी राेडवर जलवाहिनी फुटली!
अकाेला : जुने शहरातील डाबकी राेड भागात कामगार कल्याण मंडळ कार्यालयाजवळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी फुटली. यामुळे पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय झाला. याठिकाणी सातत्याने जलवाहिनीला गळती लागत असल्याचे दिसून येते. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.
मनपाचा हिवताप विभाग झाेपेत
अकाेला : शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, प्रभागांमध्ये धुरळणी, फवारणी करण्याची जबाबदारी असलेला महापालिकेचा हिवताप विभाग गाढ झाेपेत असल्याचे समाेर आले आहे. या विभागाकडून नेमक्या काेणत्या प्रभागात फवारणी केली जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही लग्न सराईमुळे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. यावेळी दुकानांमध्ये काेणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र असून, यामुळेच काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.