अकोला: जिल्ह्यातून गोवंश तस्करांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी गोवंश तस्करांसह सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए, मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या क्राईम मीटिंगमध्ये पोलीस निरीक्षकांना दिले. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची २ जानेवारी रोजी सूत्रे स्वीकारताच बच्चन सिंह 'ॲक्शन मोड ' मध्ये आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बच्चन सिंह यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत प्राधान्याने गोवंश तस्करांना बेड्या ठोकण्यावर त्यांनी फोकस केल्याचे समोर आले. शेतकऱ्यांच्या गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून त्यांची अवैधरित्या कत्तल केली जात असल्याच्या मुद्द्यावर पोलीस अधीक्षक सिंह यांनी बोट ठेवले. गोवंश तस्करांच्या अशा टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी सर्व ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना यावेळी दिले. यासोबतच शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीए तसेच मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या!सर्वसामान्य नागरिक व महिलांना जिल्ह्यात सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असल्याचे पोलीस अधीक्षक सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या अनुषंगाने पोलिसांनी व्हजीबल पोलिसिंग तसेच नाईट गस्त वाढविण्याची सूचनाही पोलीस अधीक्षकांनी केली.
अवैध प्रवासी वाहतुकीवर लक्ष द्या!अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. तसेच अशा वाहनांमध्ये प्रवाशांना अक्षरश: जनावरांसारखे कोंबून नेल्या जाते. हा प्रकार बंद करण्यासाठी यापुढे अवैध प्रवास वाहतुकीवर लक्ष देऊन कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सिंह यांनी दिले.
गुन्हे उघडकीस आणणाऱ्या अधिकारी, अंमलदार यांचा सत्कारगतवर्षात विविध गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल हस्तगत करणे तसेच क्लिष्ट तपास करणाऱ्या व एमपीडीए कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एकूण ७२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सत्कार केला. यामध्ये प्रामुख्याने पातुर येथील चोरीच्या घटनेतील ८० लाख रुपयांची चोरी उघड करणारे व पिंजर येथील लहान मुलाच्या खुनाची उकल करणारे अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा समावेश होता.