समीर सुरेश ढवळे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील सुरेश उत्तमराव ढवळे यांचे १३ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचे राहते घर सिद्धी बंगलो खंडेलवाल भवनमागे आळशी प्लॉट येथे निधन झाले होते, मात्र त्यांचा हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यासाठी आपला भाऊ पुष्कर सुरेश ढवळे कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वडील सुरेश उत्तमराव ढवळे हे गत दहा वर्षांपासून पार्किनसन या आजाराने ग्रस्त होते. २०१७ पासून त्यांच्यावर मुंबई येथील न्युरोफिजिशियन डॉ. वाडिया यांच्याकडे उपचार सुरू होते. डॉ. वाडिया यांच्या उपचाराने सुरेश ढवळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र उपचार नियमित न झाल्यास मेंदू व शरीरावर कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा सल्ला डॉ. वाडिया यांनी दिला होता. पुढील तपासणीसाठी तक्रारकर्त्यांच्या वडिलांना मुंबई येथे डॉ. वाडिया यांच्याकडे नेईपर्यंत त्यांच्या शरीराची गती मंदावली होती. तक्रारकर्त्याचा भाऊ पुष्कर ढवळे याने वडिलांना उपचारासाठी नेण्यासाठी मुंबई येथील डॉ. वाडिया यांच्याकडे ३० ऑक्टोबर २०१८ रोजी अपॉईंट घेतली होती. ठरल्याप्रमाणे पुष्कर त्यांच्या वडिलांना तपासणीसाठी घेऊन जाणार होता, मात्र ऐन वेळेवर पुष्करने वडिलांना डॉ. वाडिया यांच्याकडे नेले नाही. यानंतरही पुष्करने वडिलांच्या उपचारासाठी चालढकल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पुष्कर हा लहानसहान कारणांवरून घरात वाद घालत असल्याने आपल्या कुटुंबासोबत ३ फेेब्रुवारी २०१९ पासून स्वतंत्र भाड्याच्या घरात राहत असल्याचे तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये मूर्तिजापूर रोडस्थित ढवळे ऑटोमोबाइल्स ढवळे कॉम्प्लेक्समध्ये वडील अचानक कोसळल्यानंतर समीर ढवळे हे त्यांना मुंबई येथे डॉ. वाडिया यांच्याकडे घेऊन गेले. यावेळी त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान, पुष्कर हा वडिलांच्या आजाराचा फायदा घेत त्यांच्या नावावरील मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, २९ जुलै २०२० रोजी आरोपी पुष्कर याने मृत्यूपत्र करून सिद्धी बंगलोमधील वडिलांचा ५० टक्के हिस्सा स्वत:च्या नावावर बक्षीसपत्र व २३ डिसेंबर २०२० रोजी स्वत:च्या नावावर करून घेतला. तसेच २६ डिसेंबर २०२० रोजी मूर्तिजापूर रोडवरील स्थावर मिळकत स्वत:च्या नावावर हस्तांतरित करून घेतल्याचा आरोप तक्रारकर्ते समीर ढवळे यांनी केला.
आजाराचा फायदा घेत, कागदपत्रे बनविली!
वैद्यकीय अहवालानुसार, या काळात वडील सुरेश ढवळे यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ते कुठलाही निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे समीर ढवळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. वडील हे पुष्करच्या ताब्यात असल्याने त्याने वडिलांच्या आजाराचा फायदा घेत हे दस्त करून घेतल्याचा आरोप समीर ढवळे यांनी तक्रारीतून केला आहे. समीर ढवळे यांच्या याचिकेनुसार, न्यायालयाने गुन्हा नोंद करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.