----------------
हरभऱ्याचे पीक धोक्यात, शेतकरी चिंतित
बार्शिटाकळी : तालुक्यात रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सध्या हरभरा फूल धारणावस्थेत आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
-------------------------
बोरगाव मंजू परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस
बोरगाव मंजू : परिसरातील सिसा-मासा, बोंदरखेड, सांगळूद, वाशिंबा, बाभूळगाव शिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी चिंतित सापडले आहेत. वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
------------------------------
तूर सोंगणीला सुरुवात, शेतकरी व्यस्त
नया अंदुरा : गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी तूर सोंगणीला सुरुवात केली आहे. सध्या परिसरात तूर सोंगणीची लगबग सुरू असून, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
-------------
कपाशीची उलंगवाडी, उत्पादनात घट
बाळापूर : बोंडअळींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फरदळीचा कापूस घेणे टाळा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कपाशीची उलंगवाडी करीत असल्याचे चित्र आहे. बोंडअळींच्या प्रादुर्भावामुळे यंदा कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
-----------------------------