अकोला: खरेदी केलेल्या शेताच्या फेरफारची नोंद घेऊन फेरफारचा दाखला देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांजा मारोडी येथील प्रभारी तलाठय़ास गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. लाचखोर तलाठय़ाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात गुरुवारी दिलेल्या तक्रारीनुसार अकोला तालुक्यातील सांजा मारोडी येथील प्रभारी तलाठी सुरेश महादेव तायडे (५२) यांनी तक्रारकर्त्यास त्यांच्या गट नं. ३५ च्या खरेदी केलेल्या शेताची फेरफारची नोंद घेऊन त्याला दाखला देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पाच हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. पैसे देण्याच्या दिवस ठरला. ठरल्यानुसार तक्रारदार हे तलाठी तायडे यांना पैसे देण्यासाठी आले. या ठिकाणी आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. तक्रारदाराकडून तलाठी सुरेश तायडे यांनी पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. लाचखोर तलाठय़ाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच हजारांची लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड
By admin | Published: June 17, 2016 2:43 AM