अकोला: तलाठी संवर्गातील मंजूर पदे आणि सद्यस्थितीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल विभागामार्फत ४ डिसेंबर रोजी राज्यातील सहा विभागीय आयुक्तांना देण्यात आले. त्यानुषंगाने तलाठी संवर्गातील मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे यासंदर्भात माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे.गत १ डिसेंबर रोजी मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महसूल विभागांतर्गत तलाठी संवर्गातील आवश्यक असलेल्या माहितीसंदर्भात चर्चा करण्यात आली असून, तलाठी संवर्गातील पदांच्या सद्यस्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुषंगाने तलाठी संवर्गातील मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूल व व वन विभाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी राज्यातील महसूल विभागाच्या सर्व सहा विभागीय आयुक्तांना ४ डिसेंबर रोजी पत्राद्वारे दिले. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तलाठयांची मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हानिहाय तयार करण्यात आलेली माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तातडीने सादर करण्यात येणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयांमार्फत ही माहिती लवकरच शासनाच्या महसूल विभागाकडे सादर करण्यात येणार आहे.‘या’ विभागीय आयुक्त कार्यालयांना मागितली माहिती!तलाठी संवर्गातील पदांच्या सद्यस्थितीची माहिती शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर इत्यादी सहा विभागीय आयुक्त कार्यालयांकडून मागविण्यात आली आहे.