अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका लिकर लॉबीसह मद्यपींना सुद्धा बसल्यामुळे दोघेही कासावीस झाले आहेत. शहरातील १0२ पैकी केवळ १६ वाईन बार, शॉप, देशी दारूची दुकाने सुरू आहेत. त्यात गोरक्षण रोडवर तर सर्वाधिक वाईन बार, शॉप सुरू आहेत. त्यामुळे शहरातील तळीरामांची दारू प्राशन करण्यासाठी गोरक्षण रोडवरील बार, शॉपवर प्रचंड गर्दी होत आहे. सद्यस्थितीत गोरक्षण रोड हा तळीराम रोड बनला आहे. दारूबंदीच्या निर्णयानंतर वाईन बारमध्ये ऐटीत बसून दारू पिणे दुरापास्त झाले आहे. दारूसाठी मद्यपी आणि दारू विक्रेत लाचार झाले असून, दारूसाठी काहीपण... करायला तयार झाले आहेत. शहरातील अनेक भागातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात असल्याने, या मार्गांपासून ५00 मीटर अंतराच्या आतील वाईन बार, शॉप, देशी दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे नेहमीच्या बार, शॉपवर आता दारू मिळणे दुरापास्त आहे आणि शहरातील ५६ पैकी ५0 वाईन बार बंद झाल्याने आता कोठे बसावे, असा प्रश्न तळीरामांसमोरच नाहीतर लिकर लॉबीसमोरसुद्धा उभा ठाकला आहे. गोरक्षण रोड परिसरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात नसल्यामुळे लिकर लॉबीसह मद्यपींचे लक्षसुद्धा गोरक्षण रोडकडे वेधल्या गेले आहे. या रोडवर आधीपासून असलेले वाईन बार, शॉप, देशी दारूची दुकाने बचावली आहेत. त्यामुळेच गोरक्षण रोडवरील बार, शॉपमध्ये तळीरामांची गर्दी होत आहे. गर्दीमुळे तळीरामांना रांगेत किंवा टेबल खाली होण्याची वाट पाहावी लागत आहे. गोरक्षण रोड भाग हा उच्चभ्रू, नोकरदार, व्यावसायिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जातो. या रोड परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, मंदिर, व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. मद्यपी आणि दारू व्यावसायिकांचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील इतर भागातील मद्यपींची गर्दी गोरक्षण रोडवर होत असल्याने, हा तळीरामांचा रोड झाला आहे. त्यामुळे इतर दारू विक्रेत्यांना त्यांचे वाईन बार, शॉप स्थानांतरित करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी देऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या भागात स्थानांतरित होऊ शकतात बार, शॉपगोरक्षण रोडसह शहरातील मलकापूर, रणपिसेनगर, जवाहरनगर, खेडकरनगर, सुधीर कॉलनीचा परिसर, वृंदावननगर, रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक, जठारपेठ चौक, न्यू तापडियानगर आदी भागात शहरातील बार, शॉप स्थानांतरित होऊ शकतात. त्यामुळेच अनेक दारू विक्रेते राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर येणाऱ्या जागा, दुकानांचा शोध घेत आहेत. गोरक्षण रोडवर बार, शॉप स्थानांतरणास पोलिसांचा विरोधशहरातील १0२ पैकी केवळ १६ बार, शॉप, दारूची दुकाने शहरात आहेत; त्यापैकी चार वाईन बार, तीन बीअर शॉप आणि एक वाईन शॉप, देशी दारूचे दुकान एक गोरक्षण रोडवर आहे. त्यामुळे मद्यपींची आधीच परिसरात गर्दी होत आहे. दारू पिण्यामुळे वादविवाद, शिवीगाळ, हाणामारीच्या घटना घडू शकतात आणि शहरातील इतर भागात बार, शॉप स्थानांतरित करता येत नसल्यामुळे लिकर लॉबीला गोरक्षण रोड सोईस्कर वाटत आहे. त्यामुळे अनेक जणांनी गोरक्षण रोड भागात वाईन बार, शॉप स्थानांतरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रस्ताव दिले आहेत. त्यासाठी पोलिसांचा अहवाल लागतो; परंतु पोलिसांची डोकेदुखी वाढू नये. म्हणून पोलिसांकडून गोरक्षण रोडवर वाईन बार, शॉप स्थानांतरणास विरोध होत आहे. स्थानांतरणासाठी गोरक्षण रोडच का?शहरातील प्रत्येक भागातून राज्य महामार्ग जातात. एकमेव गोरक्षण रोड असा आहे, या भागातून एकही राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाईन बार, बीअर बार, शॉप हे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर असावेत. गोरक्षण रोड व परिसर दोन्ही महामार्गांपासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे लिकर लॉबी आपले वाईन बार, शॉप, बीअर शॉप गोरक्षण रोडवर स्थानांतरित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आठवडाभरापूर्वीच हायवेवरील एक वाईन शॉप गोरक्षण रोडवरील जुना इन्कम टॅक्स चौकात स्थानांतरित झाले आहे. या ठिकाणी अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे मद्यपींचा त्रास येथील व्यावसायिक, नागरिकांना होणार आहे.
गोरक्षण रोड झाला ‘तळीराम’ रोड!
By admin | Published: April 14, 2017 1:49 AM