अकाेला : जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध शहरांतील ज्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत त्यांना सुंदर मुलींचे फाेटाे दाखवून, त्यांची भेटही घालून देऊन लग्नाचे आमिष देत त्यांना लुटणाऱ्या टाेळीचा डाबकी राेड पाेलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. या प्रकरणातील तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीचा हा दुसरा असाच प्रकार असल्याची माहिती उघडकीस आली असून, फसवणूक झालेला वर मुलगा नंदुरबार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील रहिवासी राहुल विजय पाटील (२८) हा तीन ते चार वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत हाेता. मात्र, मनासारखी मुलगी मिळत नसल्याने ताे हैराण झाला हाेाता. अशातच त्याचे चुलत काका शेगाव येथे आले असता त्यांची ओळख पातूर येथील सुदाम तुळशिराम करवते ऊर्फ योगेश याच्याशी झाली. त्याने मोबाइल नंबर दिला. त्यानंतर सुदामसोबत चर्चा झाली असता सुदामने काही मुलींचे फोटो पाठविले व यातून मुलगी पसंत करण्याचे सांगितले. मुलगी पसंत येताच मुलीच्या वडिलांना एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून तिला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार १० डिसेंबर २०२० रोजी पाटील हे सहपरिवार पातूर बसस्टँडवर आले. ठरल्याप्रमाणे मुलीच्या मामासाेबत सुदामची भेट झाली. सुदाम या सर्वांना डाबकी रेल्वे गेट परिसरात घेऊन आला. तेथे एक मुलगी दाखविली. मात्र, ती मुलगी पसंत न आल्याने दुसऱ्या मुलीला अन्नपूर्ण माता मंदिराजवळ दाखविले. ही मुलगी पसंत आल्यानंतर मुलाकडच्यांनी तिच्या घरी बोलणी करण्यासाठी जाण्याचा आग्रह केला. मात्र, कोरोनामुळे जाता येणार नसल्याचे सांगितले, तसेच या मुलीसाेबत लग्न करायचे असेल तर पातूर रोडवरील महालक्ष्मी माता मंदिरात लग्न करा आणि मुलीला घेऊन जाण्याचे सांगितले. महालक्ष्मी माता मंदिर येथे लग्न करून दिल्यानंतर सुदामने त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये घेतली व निघून गेले. त्यानंतर वर हा मुलीसह नंदुरबारला जाण्यासाठी निघाला असता, प्रभात किड्स शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याशी वाद घालत गावातील मुलींना पैसे देऊन घेऊन जात असल्याची आरडाओरड केली. त्यानंतर नवरी गाडीतून उतरली आणि आलेल्या युवकाच्या दुचाकीवर बसून निघून गेली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ५०४, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अशाच एका प्रकरणात डाबकी राेड पाेलीस तपास करीत असताना हे दुसरे प्रकरण घडले, त्यामुळे पाेलिसांनी या टाेळीच्या मुसक्या आवळल्या असून, आणखी काही आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
--------------
दुसरा प्रकार घडताच टाेळी अटकेत
जाे प्रकार नंदुरबार येथील युवकासाेबत घडला तसाच प्रकार यापूर्वी एका युवकासाेबत घडला हाेता. त्यांचा प्रेमविवाह असल्याचे भासवून रजिस्ट्री करण्यासाठी दोघांनाही तहसील कार्यालयात शुक्रवारी बोलाविले. मात्र, तेथे त्यांचे बिंग फुटले आणि डाबकी रोड पोलिसांनी त्यांना पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपीला राहुल विजय पाटील याने ओळखले. मात्र, त्याचे नाव सुदाम तुळशिराम करवते ऊर्फ योगेश नसल्याचे समोर आले. हे नाव त्याने बनावट सांगितले होते. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.