अकाेला महापालिकेत काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत गुफ्तगू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:28 AM2021-01-04T11:28:11+5:302021-01-04T11:28:18+5:30

Akola Municipal Corporation रविवारी दुपारी महापालिकेत काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच गुफ्तगू झाल्याची माहिती आहे.

Talks between Congress and NCP leaders in Akola Municipal Corporation | अकाेला महापालिकेत काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत गुफ्तगू

अकाेला महापालिकेत काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत गुफ्तगू

Next

अकाेला : महापालिकेच्या राजकारणात काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधीचे ‘चाॅकलेट’देऊन त्यांच्यात दुफळी निर्माण करण्याची भाजपने खेळी केल्याचे वृत्त ‘लाेकमत’मध्ये उमटताच रविवारी दुपारी महापालिकेत काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच गुफ्तगू झाल्याची माहिती आहे. यावेळी काॅंग्रेस व राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या भागात एमआयएमला पडद्याआडून ‘बूस्टर डाेस’ दिला जात असल्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

फेब्रुवारी २०२२ मध्ये हाेऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने पुढील निवडणुका ह्या वाॅर्डरचनेनुसार पार पडतील, असे स्पष्ट करीत एका वाॅर्डासाठी एक सदस्य यानुसार विधेयक संमत केले आहे. वेळप्रसंगी यामध्ये बदल हाेऊन दाेन सदस्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. अशापद्धतीने हाेणारी प्रभार रचना भाजपसाठी पाेषक नसल्याचे बाेलले जाते. याचा फायदा शहरात काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला हाेणार हे निश्चित मानले जात आहे. ही बाब ध्यानात घेता सत्ताधारी पक्ष भाजपकडून आतापासूनच इतर पक्षांतील नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विराेधी पक्षांतील नगरसेवकांना निधी वाटपाचे ‘चाॅकलेट’ देण्याच्या प्रकाराची काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. रविवारी महापालिकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख व काॅंग्रेसचे गटनेता तथा विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्यात भाजपच्या वाटचालीला छेद देण्याच्या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे.

निवडणुकीत भाजपला घेरण्याची तयारी

दाेनपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली प्रभाग रचना भाजपसाठी अनुकूल मानली जाते. एका वाॅर्डात दाेन सदस्य असल्यास शहरातील बहुतांश वाॅर्डांमध्ये उमेदवार निवडून आणताना भाजपचा चांगलाच कस लागणार आहे. मनपामध्ये काॅंग्रेस व राकाॅं नेत्यांत पार पडलेल्या बैठकीत भाजपला आगामी निवडणुकीत कसे घेरता येईल, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गळाला?

राष्ट्रवादीतील तीन नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजपकडून जाेरदार प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये जुने शहरातील दाेन व मध्यभागातील एकाचा समावेश आहे. जुन्या नगरसेवकांना पक्षात ठेवण्याचे आव्हान नवनियुक्त महानगराध्यक्षांसमाेर असून, यामध्ये ते कितपत यशस्वी हाेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Talks between Congress and NCP leaders in Akola Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.