संतोष येलकर / अकोला : येत्या खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय खरीप नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार असून, त्यासाठी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
खरीप हंगामातील पेरणीपूर्वी तालुकानिहाय पेरणीचे प्रस्तावित नियोजन आणि बियाण्यांची उपलब्धता या संदर्भात लोकप्रतिनिधींना माहिती असावी, या दृष्टीने अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय खरीप नियोजनाच्या आढावा बैठका घेण्याचे निर्देश अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांनी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत प्रत्येक तालुक्यात संबंधित आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय खरीप नियोजनाच्या बैठका ६ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत. या बैठकांनंतर पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप नियोजनाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
गावनिहाय शेतकऱ्यांकडील बियाण्यांची माहिती मागितली!
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत गावनिहाय शेतकऱ्याकडे पेरणीयोग्य बियाणे किती उपलब्ध आहेत, या संदर्भात कृषी विभागामार्फत कृषी सहायकांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय खरीप नियोजनाच्या बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
- शंकर तोटावार
प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.