तामसी गावातील ग्रामसेवक पी. एम. खंडारे हे वैद्यकीय रजेवर असून, गावाचा कामकाज सुरळीत चालविण्यासाठी खंडारे यांच्याकडील शासकीय, आर्थिक योजनानिहाय दस्तावेजचा संपूर्ण प्रभार ग्रामसेवक कैलास राठोड यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे. तसेच बाळापूरचे गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामसचिव यांना १६ एप्रिलपासून आदेश दिल्यानंतर सुद्धा ग्रामसेवक कैलास राठोड यांनी तामसी गावाचा पदभार स्वीकारला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांनी पदभाराबाबत विचारणा केली असता, मी प्रभार स्वीकारत नसल्याचे सांगितले आहे. या गंभीर प्रकाराकडे गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते. यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे. राठोड यांनी गावाचा कारभार न स्वीकारल्याने विविध विकासकामे, ग्रामस्थ, विद्यार्थी शेतकरी यांना लागणारे कागदपत्रे ग्रामपंचायतशी निगडित सर्वच कामे ठप्प आहे. या तामशी गावाचा कारभार तत्काळ संबंधित कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे किंवा त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तामसी गावाचे सरपंच मनीषा विजय पातोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तामसी गावाला ग्रामसचिव मिळेना, काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:31 AM