ऑनलाइन लोकमतअकोला, दि. २९ : टॅँकरने कारला चिरडल्याने चिमुकलीसह पाच जण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर ते तरोडा फाट्यादरम्यान रविवारी दुपारी घडली. अपघातात गुजरातमधील तिघांचा, तर मध्यप्रदेशातील दोघींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.
एमएच-४६-एफ-०५४२ या क्रमांकाचा टॅँकर बाळापूर येथून खामगावकडे जात होता. टॅँकरने विरुद्ध दिशेने येत असलेल्या डीडी-०३-इ-२९०६ या क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील पाच जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस व वाहतूक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविले. अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतुकीची कोंडी दूर केली. या दुर्घटनेत गुजरातमधील वापी येथील चतुर्भूज मुरलीधर कारंजावाला (वय ४५ ), संगीता चतुर्भूज कारंजावाला (वय ४०) आणि यश चतुर्भूज कारंजावाला (वय २०) यांच्यासह बऱ्हाणपूर येथील रंजना मन्नूभाई नागर (३५) आणि आयना मन्नूभाई नागर (वय ६) हे मृत्युमुखी पडले.
रस्त्याने केला घातदुर्घटनास्थळी, तरोडा फाट्याजवळ उतार आहे. याठिकाणी चालकाने कार उतरविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या टॅँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टॅँकरने कारला धडक देऊन, ती एका बाजूने काही अंतरापर्यंत फरपटत नेली. त्यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले.
पोलीस कर्मचारी अत्यवस्थअपघाताची माहिती मिळाल्यानंतर बाळापूर बायपासवरील वाहतूक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारमध्ये फसले होते. मृतदेह छिन्नविच्छन्न झाले होते. मृतदेह कारमधून बाहेर काढताना, पोलीस कर्मचारी नितीन लिखार यांनी प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.
१५ वर्षांनंतर झाली होती अपत्यप्राप्तीसंगीता कारंजावाला व रंजना नागर यांचे माहेर बाळापूर असून, त्या वडील रजनिकांत शाह यांच्याकडे भेटीसाठी यायच्या. रंजना यांना लग्नाच्या १५ वर्षानंतर मुलगी आयना हिच्या रूपाने कन्यारत्न प्राप्त झाले होते. मुलीच्या जन्मानंतर तिला माहेरी घेऊन येत असतानाच, काळाने दोघींवरही घाला घातला.