अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त सहा गावांमध्ये शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टँकरच्या डिझेलचा खर्च उधारीवर सुरू आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नसलेल्या जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त सहा गावांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित सहा गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु पाणीपुरवठा करणार्या टँकरमध्ये डिझेल भरण्याचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणार्या शासकीय टँकरमध्ये डिझेल भरण्याचा खर्च प्रशासनाला उधारीवर भागवावा लागत आहे. शासनमार्फत निधी उपलब्ध झाल्यानंतर टँकरच्या डिझेल खर्चाची देयके अदा करण्यात येणार आहेत.
टँकरच्या डिझेलचा खर्च उधारीवर!
By admin | Published: May 05, 2016 2:38 AM