गायगाव : डेपोतून १२हजार लिटर पेट्रोल व मातीची वाहतूक करणारा टिप्पर यांचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात अपघात होऊन २ जण जखमी झाल्याची घटना ४ जानेवारी गुरुवारी सकाळी अकोला मार्गावर बाराखोली शिवारात घडली .गायगाव येथील डेपोतून एम. एच. ३१ ए .पि. ७१६९ क्रमांकाचा टँकर १२ हजार लिटर पेट्रोल घेऊन अकोला कडे जात असताना मागून आलेला एम. एच. १२ एफ. ए. ९६८० क्रमांकाचा टिपर चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवीत टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र, नियंत्रण सुटल्यामुळे सदर टिपर थोडा अंतरावर जाऊन टँकर समोरच उलटला .अपघातात टिपर चालक विनोद अर्जुन पहूरकर (३५), वाहक सोनू जय दामोदर (२५),दोघेही रा. टाकळी (जलम) हे जखमी झाले. टँकरचा वेग कमी व चालकाने दाखवलेले प्रसंगावधान यामुळे पुढील अनर्थ टळला. पेट्रोल भरलेल्या टँकरचा अपघात झाल्याचे समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून पेट्रोल डेपोचे अधिकारी,कर्मचारी, अग्नीशमन दल,पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले.अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लगेच क्रेन बोलावून रस्त्यावर उलटलेला मातीची वाहतूक करणारा टिपर सरळ केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)