अकोला : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन १२ दिवस झाले आहे; परंतु पश्चिम महाराष्ट्र, कोकणचा भाग सोडता उर्वरित भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर कायम आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३५४ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. परिणामी, चालू वर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवल्या. १४ जूनपर्यंत प्राप्त माहितीत सद्य:स्थितीत राज्यात ३५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पावसाचे आगमन झाल्याने राज्यात टँकरची संख्या घटली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात टँकरची संख्या निम्म्यावर आली; परंतु विदर्भ व मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने येथे टँकरची संख्या कायम आहे. विदर्भात ११३ तर मराठवाड्यात ८१ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. या भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
टँकरव्दारे पाणीपुरवठा
विदर्भ ११३
मराठवाडा ८१
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात टँकर घटले!
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी टँकरची संख्या घटली आहे. १४ जूनपर्यंत प्राप्त अहवालात कोकण ५१, नाशिक ७५, पुणे विभागात ३४ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा टँकर कमी
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा राज्यात टँकरची संख्या कमी आहे. मागील वर्षी याच वेळेला ७९९ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.