- संतोष येलकर
अकोला : ‘मार्च एन्डिंग’ला २० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याच्या पृष्ठभूमीवर गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाची लगबग सुरू असतानाच, २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करीत २९ फेबु्रवारीपर्यंत १०३.७४ टक्के गौण खनिज महसूल वसूल करण्याची कामगिरी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. त्यामुळे ‘मार्च एन्ड’ पूर्वीच जिल्ह्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे ‘टार्गेट’ ओलांडले आहे.२०१९-२० या आर्थिक वर्षात वाळू, मुरूम, गिट्टी, दगड, माती इत्यादी गौण खनिजांचे स्वामित्वधन शुल्कासह (रॉयल्टी) अवैध उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनामार्फत राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आले. ‘मार्च एन्डिंग’ला २० दिवसांचा कालावधी उरला असल्याने, गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. २०१९-२० या वर्षात अकोला जिल्ह्यासाठी गौण खनिज महसूल वसुलीचे ४९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात २९ फेबु्रवारीपर्यंत ५० कोटी ८३ लाख २६ हजार रुपये (१०३.७४ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे ‘मार्च एन्डिंग’पूर्वीच अकोला जिल्ह्यात गौण खनिज महसूल वसुलीचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यात आले आहे.वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात ‘हॅट्ट्रिक’!गौण खनिज महसूल वसुलीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला २०१७-१८ या वर्षात ४२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत ४६ कोटी रुपये महसूल वसुली करण्यात आली. २०१८-१९ या वर्षात ४६ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करीत ६३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आणि २०१९-२० या वर्षात ४९ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करीत ५० कोटी ८३ लाख २६ हजार रुपये महसूल वसुली करण्यात आली. त्यामुळे गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली आहे.गौण खनिज महसूल वसुलीच्या कामात गत दोन वर्षातील कामगिरीप्रमाणे यंदा तिसऱ्या वर्षी फेबु्रवारी अखेरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गौण खनिज महसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.- डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.