देशात विविध प्रकारचे मसाले तयार होतात. मात्र, सिंगापूर, इंडोनेशिया या ठिकाणांहून मसाल्याचे पदार्थ भारतात येतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाले महागले आहेत. तोंडाची चव वाढविणारे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्याच्या दरात अवघ्या १५ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. १ हजार ६०० रुपये किलोने असलेल्या खसखशीचा दर ३ हजार रुपये किलोवर गेला आहे. चटणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रामपत्री, तमालपत्री, जायपत्री यांचे दर दुपटीने वाढले आहेत.
असे वाढले दर (५० ग्रॅम)
जुने दर नवे दर
भेंडी विलायची ६० ७०
काळी मिरी ४० ४५
बाजाफूल ५० ८०
शाहजीरे ४० ५०
लवंग १२० १४०
जायपत्री १२० १४०
महागाई पाठ सोडेना!
दीड वर्षापासून कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहे. त्यातच घर चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. मागील १५ दिवसांपासून मसाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घराचे बजेटच आणखी वाढले आहे.
- राजश्री नेमाने, गृहिणी
उन्हाळ्यात बहुतांश मसाले तयार करून ठेवले आहेत. त्यावेळेसही मसाल्याच्या किमतीत वाढ झाली होती. आता परत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता मसाला विकत घ्यायला गेल्यास दुप्पट किंमत मोजून मसाले विकत घ्यावे लागतील.
- वैष्णवी देशमुख, गृहिणी
म्हणून वाढले दर
महिला वर्ग प्रामुख्याने उन्हाळी दिवसातच चटणी तयार करून ठेवतात. त्यावेळी मसाल्यांची मागणीही अधिक असते; परंतु आता मागणी कमी असली तरी दरात मात्र वाढ झाली आहे.
- राजेश निवाणी, विक्रेता
मागील १५-२० दिवसांपासून मसाल्याचे दर वाढले आहेत. काही मसाल्यांच्या पदार्थांचे दर दुप्पट झाले आहेत. तर काही मसाल्यांच्या किमतीत ५० ग्रॅम मागे १०-२० रुपये वाढले.
- राजेश निळे, विक्रेता