अकोला, दि. २८: शिक्षकांमुळे विद्यार्थी नाहीतर समाज घडत असतो. समाजाचा शिक्षक हा खरा मार्गदर्शक आहे. शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळे, ज्ञानामुळे देशाला उत्कृष्ट वैज्ञानिक, अभियंता, डॉक्टर मिळाले आहेत. शिक्षक हे खर्या अर्थाने माणसं घडविण्याचे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशनच्यावतीने रविवारी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अधिवेशन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे उद्घाटक म्हणून प्रा. खडसे बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पंजाबराव वानखडे, डाटाचे विभागीय सचिव डॉ. एम.आर. इंगळे, जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एम. भोवते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. खडसे यांनी शिक्षकांना एकत्रित करण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना हवी. डाटा ही संघटना नसून, शिक्षकांसाठीची एक चळवळ आहे. शिक्षक हा स्वत:साठी नाहीतर समाजाच्या भल्यासाठी झटत असतो, असे मत व्यक्त केले. अधिवेशनामध्ये पंजाबराव वानखडे यांनी संस्थेने कशाप्रकारे कार्य करावे. याविषयी मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्यानुसार राज्यकर्ती जमात व्हा आणि आपल्या कुटुंबासोबतच समाजाचा व देशाचा विकास करा. स्वत:चे ध्येय निश्चित करा, तरच आपण समाजाची प्रगती साधू शकतो, असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. भडांगे यांनी डाटा ही शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटले पाहिजे. बहुजनांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. असे मत मांडले. अधिवेशनामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. संजय खडसे, डॉ. सुभाष भडांगे, पंकज जायले, पी.जे. वाठ, प्रवीण तायडे, डॉ. एम.एस. प्रधान, राजेंद्र पातोडे, प्रा. मुकुंद भारसाकळे, शरद चव्हाण, विजयकांत सागर, अमोल मिटकरी, मनोज भालेराव यांच्यासह नेट, सेट, आचार्य पदवी प्राप्त करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी, पदवी परीक्षेत प्रावीण्यश्रेणीत गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कैलास वानखडे यांनी केले. आभार डॉ. भास्कर पाटील यांनी मानले.
शिक्षक समाजाचा मार्गदर्शक - खडसे
By admin | Published: August 29, 2016 1:25 AM