- राजेश शेगाेकार
अकाेला: राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीचा धर्म अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावेळी भाजप-शिवसेना समर्थित उमेदवाराने या मतदारसंघात बाजी मारली होती; मात्र आता भाजप-सेनेची युती बिनसल्याने शिवसेना नवा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी या एकाच बॅनरखाली एकच उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता यामुळे नष्ट झाली असून, सध्या दोन उमेदवारांनी शिवसेनेकडून समर्थन मिळविण्याकरता मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये सध्या उमेदवारीवरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना समर्थित श्रीकांत देशपांडे यांनी विजय मिळवित हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. पाच वर्षात त्यांनी मतदारसंघातील संपर्क कायम ठेवला असला तरी पाच जिल्ह्यांच्या या मतदारसंघात अनेकांना आमदारकीचे धुमारे फुटले आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी आतापासूनच प्रचारात उतरली आहे. अशा स्थितीत राज्यातील सत्तांतराचा प्रभाव उमेदवारांच्या निवडीवर होताना दिसत आहे. भाजप-शिवसेना यांच्यामध्ये बेबनाव झाल्यामुळे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना कोणाचे समर्थक मिळेल, याबाबत शंकाच आहे. श्रीकांत देशपांडे हे मूळचे शिवसैनिक असले तरी त्यांना पुन्हा सेनेकडून समर्थन मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजपनेही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याची तयारी सुरू केली असल्याने शिवसेनाही नव्या दमाने रिंगणात उतरण्याची चाचपणी करत आहे. इच्छुक उमेदवारांपैकी दोन प्रभावी उमेदवारांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले असून, शिवसेनेने समर्थन द्यावे, अशी मोर्चेबांधणी केली आहे. अमरावती विभागातील शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि आमदारांनीही यासंदर्भात मातोश्रीकडे रदबदली केल्याची चर्चा आहे. या पृष्ठभूमीवर शिवसेनेने उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीतील काॅग्रेस राष्ट्रवादी त्या उमेदवाराला समर्थन देण्याची शक्यता कमीच असल्याचे चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म धाेक्यात येण्याची शक्यता आहे.