अकोला : ‘वाचाल तर वाचाल...’ , ही म्हण केवळ भिंतीची शोभा वाढवित आहे. प्रत्यक्षात मुले, पालक आणि शिक्षकांमधील वाचनाची सवय कमी होत आहे. वाचन संस्कृती लोप पावत आहे, अशी चर्चा नेहमीच केली जाते. निरनिराळी पुस्तके वाचनामुळे बुद्धी, मन याचा विकास होतो आणि ज्ञानात वृद्धी होते. बालमनावर वाचनाचे संस्कार झाले पाहिजेत. असे असले तरी पालक, विद्यार्थी करिअर केंद्रित झाले आहेत. अभ्यास सोडून पुस्तक वाचनाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शिक्षक, पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केले. बुधवारी दुपारी लोकमत परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती कमी होत आहे का, या विषयावर आयोजित परिचर्चेमध्ये शहरातील शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. वाचन संस्कृती लोप पावत आहे. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी शालेय स्तरावरच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. माहिती, तंत्रज्ञानात बदल झाले आहेत. त्यानुरूप विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पुस्तके वाचनाचा शाळा, शिक्षकांनी आग्रह धरला पाहिजे. बालमनावर वाचन संस्कार झाले पाहिजेत, यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन मुलांमध्ये वाचनाची आवड रुजविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. शिक्षकांनीसुद्धा मुलांचा वाचनाकडे कल वाढविण्यासाठी पालकांना सातत्याने प्रोत्साहित करण्याची गरज आहे.असे मतही मुख्याध्यापक, शिक्षकांनी मांडले. शाळा, पालकांना विद्यार्थ्यांकडून १०० टक्के निकालाची अपेक्षा आहे. मुला-मुलींनी वाचनापेक्षा अभ्यासात अधिक लक्ष घालावे, याकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे वाचन कमी झाले आहे. नुसते पुस्तकी पाठांतरावर भर देऊन विद्यार्थी स्पर्धेत उतरत आहेत; परंतु व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या, ज्ञानात भर घालणाऱ्या पुस्तकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, याची खंत वाटते. बालवयात पुस्तकांमधून होणारे संस्कार अधिक परिणामकारक ठरतात. - गजानन चौधरी, मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय.वाचन संस्कृतीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी किशोर, चांदोबा मासिक वाचली जायची. आता हेच टीव्ही, मोबाइलच्या माध्यमातून विद्यार्थी ग्रहण करतात; परंतु विद्यार्थी वाचनाकडे वळले पाहिजेत. पालकांनीही मानसिकता बदलून मुलांना वाचनाची सवय लावावी. पालक, शिक्षकच पुस्तकांचे महत्त्व सांगू शकतात. मुलांना पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे, आमच्या शाळेमध्ये आवर्ती ग्रंथ योजना, वाचन संस्कृती मंडळ आहे. लोकमत संस्काराचे मोती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे वाचनही वाढले आहे. - माधव मुन्शी, मुख्याध्यापक न्यू इंग्लिश हायस्कूल.माहिती व तंत्रज्ञानामुळे पुस्तके वाचनाकडील कल कमी झाला आहे. इंटरनेटवर पुस्तके उपलब्ध झाली आहेत. बदलत्या काळानुसार आम्ही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शाळेत वाचन बौद्धिक मंडळांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांना वर्गात थोडक्यात माहिती सांगायला लावतो. पुस्तकांमधून कोणतं ज्ञान, माहिती मिळाली, हे जाणून घेतो. वाचन संस्कृती रुजविण्यामध्ये लोकमत संस्काराचे मोती उपक्रमाचाही मोठा हातभार लागत आहे. - सतीश सरकटे, ग्रंथपाल भारत विद्यालयमुलांचेच काय पालकांचे सुद्धा वाचन बंद झाले आहे. ‘वाचाल तर वाचाल’ याकडे कोणी लक्ष देत नाही. शाळेमध्ये संस्कार मोती उपक्रमांतर्गत बोधकथा, देशांची माहिती, सामान्य ज्ञान याचे विद्यार्थी वाचन करतात. मुलांमधील वाचनाला चालना देणारा हा उपक्रम आहे. वाचन ही काळाची गरज असल्यामुळेच आम्ही ‘वाचन कोपरा’ ही संकल्पना राबवितो. फावल्या वेळात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचायला देतो. पालकांनी वाचनाचे महत्त्व जाणून मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. - रंजना मुळे, मुख्याध्यापिका, जागृती विद्यालयमाहिती व तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहे. त्याचाही परिणाम वाचन संस्कृतीवर होत आहे. लोकमत संस्काराचे मोती उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती मिळत आहे. त्याचे संकलन विद्यार्थी करतात. यातून बालमनावर योग्य संस्कार केले, तर आवड निर्माण होते. वाचनातून मार्गदर्शन मिळते. वाचनसंस्कृती रुजली पाहिजे. यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तके वाचायला देऊन, त्यांचा अभिप्राय जाणून घेतो. वाढदिवसाला ग्रंथालयाला पुस्तके भेट देतात.- मेधा देशपांडे, मुख्याध्यापिका जिजाऊ कन्या शाळा लोकमत संस्काराचे मोती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती प्राप्त होत आहे. वाचनामध्ये भर पडली आहे. वाचनाचे संस्कार बालवयात व्हावेत, यासाठी हा प्रयत्न छान आहे. आमच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी, पालकांसाठी वाचनालय चालवितो. प्रत्येक वर्गासाठी एक ग्रंथालयाची तासिकासुद्धा आहे. पालकांना दर आठवड्याला पुस्तक घेऊन जाण्यासाठी आग्रह धरतो. पालकांनीही पुस्तके वाचावीत. विद्यार्थ्यांनाही द्यावी. शिक्षक, पालकांच्या समन्वयातूनच मुलांमध्ये वाचनाचे संस्कार होऊ शकतात.- मंजिरी कुळकर्णी, शिक्षिका बाल शिवाजी शाळा
वाचन संस्कृतीसाठी शिक्षक, पालकांची भूमिका महत्त्वाची!
By admin | Published: July 14, 2017 1:19 AM