- नितीन गव्हाळे
अकोला: शासनाने मोठ्या उत्साहात शिक्षक भरती घेण्याची घोषणा केली. पवित्र पोर्टलवर बिंदूनामावली, आरक्षण, रिक्त जागांची माहितीही अद्ययावत केली आणि १ मार्चपासून शिक्षक भरतीच्या जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध केल्या; परंतु शिक्षण विभागाच्या या सर्व प्रक्रियेवर लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी फेरल्या गेले. शिक्षक भरतीमध्ये आचारसंहितेने खोडा घातल्यामुळे शिक्षक भरतीच्या जाहिरातीच बंद झाल्या नाहीत तर शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रियाच थांबली आहे. यासंदर्भात आता चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाने २६ मार्चला पुण्यात बैठक बोलाविली असून, या बैठकीनंतर शिक्षक भरतीचे चित्र स्पष्ट होईल.राज्यात शिक्षकांच्या २0 हजारावर जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याची मागणी अनेकदा करण्यात येत होती. अखेर शासनाने शिक्षक भरती घेण्याचा निर्णय घेतला. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शासनाने शिक्षक भरतीची तयारी सुरू केली आणि अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच भरतीमध्ये स्थान देण्याचे निश्चित केले. त्यानुसार पवित्र पोर्टलवर १ मार्चपासून शिक्षण संस्थांच्या शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या खऱ्या; परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया औटघटकेची ठरते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच ११ मार्चपासून इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर माहिती भरायची होती. ती सुद्धा थांबविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया ठरविण्याबाबत शिक्षण विभागाने २६ मार्च रोजी पुण्यात बैठक बोलाविली असून, या बैठकीनंतरच शिक्षक भरतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पवित्र पोर्टलवरील सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबली आहे, तसेच २६ मार्चला पुण्याला शिक्षण विभागाने बैठक बोलाविली आहे. या बैठकीत मिळालेल्या सुचनांनुसार भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होईल.-प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, अकोला.या जागांच्या जाहिराती प्रकाशितजिल्हा परिषद- ७५६३मनपा- ५४३नपा- २२७खासगी शाळा- १९३३