अकोला : डिसेंबर २०१९ च्या वेतनासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात निधी प्राप्त असताना संबंधित बीट लिपिकांनी शिक्षकांचे वेतन अदा करण्याची कार्यवाहीच केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. याप्रकरणी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी करणारे पत्र जिल्हा शिक्षक संघटना संघर्ष समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले आहे.शिक्षकांचे दरमहा वेतन ५ तारखेच्या आत अदा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सातत्याने दिले आहेत; मात्र कधी वित्त विभाग तर कधी पंचायत समिती स्तरावरून वेतन अदा करण्यास प्रचंड विलंब केला जातो. तोच प्रकार या महिन्यातही सुरू आहे. डिसेंबर २०१९ च्या वेतनाचे अनुदान पंचायत समिती स्तरावर प्राप्त आहे; मात्र संबंधित बीट लिपिकांनी देयके अद्यापही सादर केलेली नाहीत. तसेच ‘डीसीपीएस’धारकांचा सातव्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने देणे आवश्यक होते. त्यााबाबतही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक वेतनासोबतच सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यापासून वंचित आहेत. ही समस्या नेहमीची आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटना संघर्ष समितीचे समन्वयक राजेश देशमुख यांनी पत्रातून केली आहे. समितीमध्ये दिलीप सरदार, अरुण धांडे, संजय घोडे, ग. ल. पवार, शंकर डाबेराव, प्रकाश राऊत, पुंडलिक भदे, मंगेश दसोडे व मारोती वरोकार यांचा समावेश आहे.
निधी असताना शिक्षकांचे वेतन रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 1:09 PM