अकोला: मनपातील कर्मचारी व शिक्षकांसाठी गठित केलेल्या मनपा शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. २००५ मध्ये संस्थेमार्फत उचल केलेल्या कर्जाची परतफेड करूनही आजपर्यंत व्याजाची रक्कम कायम असल्याचा आरोप मनपातील ५३ कर्मचाºयांनी केला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश मूर्ती यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.मनपा कर्मचाºयांसाठी गठित करण्यात आलेल्या मनपा शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मनपातील ५३ कर्मचाºयांनी कर्ज स्वरूपात आर्थिक रकमेची उचल केली होती. कर्जाची उचल करणाºयांमध्ये बहुतांश चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा समावेश आहे. २००५ मध्ये अवघ्या ३० ते ५० हजार रुपये कर्जाची उचल केल्यानंतर सदर रकमेची व्याजासह परतफेड केली जात आहे. तेरा वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्यापही संबंधित कर्मचाºयांवर व्याजाचा बोजा कायम असल्याचे चित्र आहे. पतसंस्थेकडून मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप सदर कर्मचाºयांनी केला आहे. याप्रकरणी कर्मचाºयांनी मनपाचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली होती. कर्जाची रक्कम दिवसेंदिवस वाढत असून, कर्मचाºयांच्या वेतनातून मासिक हप्त्याने रक्कम वळती केली जात आहे. याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती जितेंद्र वाघ यांच्याकडे केली असता, वाघ यांनी समृद्धी पतसंस्थेला आजपर्यंतचा हिशेब व कर्जाची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश देत डिसेंबर २०१७ पासून वेतनातून कर्जाची रक्कम वळती न करण्याचे निर्देश लेखा विभागाला दिले होते.जिल्हा उपनिबंधकांकडे धावपतसंस्था कर्जाची उचल करणाºयांचे दस्तावेज, आजवर जमा झालेली रक्कम व थकीत रकमेची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून कर्मचाºयांनी जिल्हा उपनिबंधक गोपाल मावळे यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी उपनिबंधकांनी पतसंस्थेला माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पतसंस्थेकडून माहिती प्राप्त होताच चौकशी व त्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
सदर प्रकरण उच्च न्यायालयात असून, मनपा आयुक्त, अकोला तहसील उपनिबंधक यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. मनपा अशाप्रकारे कर्जाचे हप्ते थांबवू शकत नाही. यासंदर्भात उपायुक्तांनीच हमी पत्र दिले होते. कर्मचाºयांनी २००५ मध्ये कर्जाची उचल केल्यानंतर २०१३ पर्यंत कर्जाची रक्कम जमा केली नाही. यामुळे अशा कर्मचाºयांना नोटीस जारी केली.- नरेश मूर्ती, अध्यक्ष समृद्धी पतसंस्था