अकोला : अमरावती येथील मनपा शाळेत कार्यरत असलेला शिक्षक मंगेश अशोकराव खंडारे याला धनादेश अनादर प्रकरणी दोन विविध प्रकरणात तिसरे सह दिवाणी न्यायाधीश यांनी प्रत्येकी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. यासाेबतच तीन लाख ५६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अमरावती येथील महानगरपालिकेच्या शाळेवर मंगेश खंडारे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी २०१४ साली व्यावसायीक अनुप डोडिया यांच्याकडून एक लाख रुपये हात उसने म्हणून घेतले होते. त्याबदल्यात सुरक्षेपोटी दोन धनादेश सुद्धा दिले. ठरलेल्या वेळेनुसार याचिकाकर्त्याला धनादेश वटविण्यासाठी सांगितले. याचिकाकर्ते यांनी धनादेश वटविण्यासाठी बँकेत लावला असता खात्यात रक्कम नसल्याच्या कारणाने दोन्ही धनादेश अनादरीत झाले. डोडिया यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तब्बल आठ वर्षांनी दोन्ही प्रकरणात न्यायालयाने निकाल देत शिक्षक मंगेश खंडारे यांना दोषी ठरवले. एक महिना कारावासाची शिक्षा व तीन लाख ५६ हजार रुपयांचा दंड ठाेठावला़ दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. रश्मीन लढ्ढा यांनी कामकाज पाहिले.