गणेश मापारी। लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेशासाठी देण्यात येणारे अनुदान लाभार्थी विद्यार्थी व विद्यार्थ्यांची आई यांच्या संयुक्त खात्यात जमा करावे लागणार आहेत; मात्र तालुक्यात एकाही विद्यालयाचे अशा प्रकारचे संयुक्त खाते नसल्याने नवीन बँक खाते उघडण्यासाठी सर्वच शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना, शेकडो विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचे अनुदान मुख्याध्यापकांच्याच खात्यात पडून राहण्याची शक्यता आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांकडे गणवेश असावा, यासाठी शासनाने जून महिन्यातच मुख्याध्यापकांच्या खात्यात गणवेशाची रक्कम वळती केली आहे; परंतु शाळा सुरू होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटल्यावरही बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांचेही अनुदान त्यांच्या संयुक्त खात्यात जमा झाले नाही. परिणामी, शासनाने सदर अनुदानपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना रोख स्वरूपात द्यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.गरीब पालकही सोडणार अनुदान!दोन गणवेशासाठी ४०० रुपये इतके तोकडे अनुदान मिळणार, त्यासाठीही गणवेश खरेदी केल्याची पावती मुख्याध्यापकांकडे द्यावी लागणार असून, सदर रक्कम संयुक्त खात्यात जमा होणार आहे. बँक खाते उघडण्यासाठीही मोलमजुरी पाडून कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही बाब पालकांना खटकत आहे. केवळ ४०० रुपयांसाठी एवढा आटापिटा करण्यापेक्षा अनुुदान नकोच, अशी भूमिका ग्रामीण भागातील गरीब पालकांनी घेतली आहे.
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यासाठी ‘गुरुजी’ अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:33 AM