अकोला : जनगणना अंतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासह ऑनलाइन पद्धतीने प्रभागांची गटमांडणी करण्याचे आदेश महापालिका शिक्षकांना देण्यात आले. ही कामे अशैक्षणिक असल्यामुळे जनगणनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मनपा शिक्षकांनी मंगळवारी घेतला. यादरम्यान संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांच्या वेळापत्रकात बदल केला असून, बुधवारपासून सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. आगामी दीड वर्षांनंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम पार पडेल. २0१२ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत वॉर्ड पद्धती बदलून प्रभागनिहाय रचना करण्यात आली. आता पुन्हा दोन प्रभागांचा एक वॉर्ड किंवा एक प्रभाग करण्यावर राज्य निवडणूक आयोग चर्चा करीत आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने प्रभाग गटमांडणी प्रणाली अंतर्गत प्रभाग रचनेचे क्षेत्रफळ अद्ययावत करून संगणकामध्ये माहिती संकलित करण्याचे प्रशासनाने आदेश दिले तसेच जनगणना अंतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचेही निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देत असताना अशैक्षणिक कामे शक्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महाराष्ट्र शिक्षक सेनेने लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जनगणनेच्या कामकाजावर शिक्षकांचा बहिष्कार
By admin | Published: October 14, 2015 1:23 AM