अकोला: जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसात विषय शिक्षकांना पदस्थापना, न्यायालयाच्या आदेशाने दिलेल्या पदस्थापनेत गोंधळ झाल्याचे सांगत याप्रकरणी शिक्षण विभाग जबाबदार असून, शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांचा प्रभार काढण्याचीही मागणी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी सोमवारी केली. सोबतच विविध मुद्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी निर्देश दिले.सभेत शेगाव येथील जिल्हा परिषदेच्या जागेसंदर्भात बांधकाम विभागाने काय केले, याची विचारणा सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. त्यावर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्या जागेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले. सोबतच शिक्षण विभागाने लगतच्या काळात केलेल्या बदली प्रक्रियेत काही शिक्षकांवर अन्याय करण्यात आला. त्यासाठी समुपदेशन प्रक्रियेचे छायाचित्रण टाळण्यात आले. तीन शिक्षकांना सोयीची ठिकाणे मिळाली नाहीत. ही प्रक्रिया योग्यपणे पार पाडण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असताना शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचा प्रभार काढण्याची मागणीही पांडे गुरुजी यांनी केली. पारस महाजल योजनेतील पाण्याची रासायनिक तपासणी करून ते पिण्यायोग्य असल्यास पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी रामदास लांडे यांनी केली. सभेत जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागामार्फत २०१८-२९ या वर्षात शेळी पालन व्यवसायासाठी शेळीगट पुरवण्याच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. शंभर टक्के अनुदानातून शेळीगटासाठी ३७ लाख १ हजार रुपये निधी आहे. सभेत सभापती रेखा अंभोरे, माधुरी गावंडे, देवका पातोंड यांच्यासह सदस्या शोभा शेळके, गजानन उंबरकर उपस्थित होते.