लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची फेरतपासणी आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत (जीएडी) करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेंतर्गत सेवेची बारा वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून ४९० प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. या प्राप्त प्रस्तावांच्या तपासणीचे काम सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुरु करण्यात आले होते. त्यामध्ये ३५० शिक्षकांचे प्रस्ताव चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र ठरले असून, उर्वरित काही प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले व काही प्रस्ताव त्रुटींमुळे प्रलंबित ठेवण्यात आले. चटोपाध्याय वेतश्रेणीसाठी प्राप्त प्रस्तावांची फेरतपासणी आता जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्याची तयारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुरु केली असून, त्यासाठी शिक्षकांचे प्रस्ताव एक-दोन दिवसात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्राप्त प्रस्तावांच्या तपासणीची प्रक्रिया रेंगाळल्याने, जिल्हयातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.