२७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहेत. सदर बदल्यांची कार्यवाही होत असताना साहायक शिक्षक, विषय शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापक या संवर्गातील कार्यरत शिक्षकांचे संवर्गनिहाय अचूक मॅपिंग होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ही संगणकीकृत असल्याने सुधारणेला वाव राहत नाही. जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सन २०१८ मध्ये झालेल्या बदल्यांच्या वेळी विषय शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची ७०० पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने त्यांच्या जागी कार्यरत असलेल्या जवळपास तेवढ्याच सहाय्यक शिक्षकांची पदे अतिरिक्त दाखविण्यात आली व त्याचा परिणाम बदली प्रक्रियेवर झाला होता. जिल्ह्यातील सहाशेपेक्षा जास्त शिक्षक विस्थापित झाले होते. त्यावेळी सुद्धा संघटनेने वेळोवेळी निवेदने दिली होती. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याचा फटका अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक व विशेषतः महिलांना बसला होता. सन २०१९ मध्ये सुद्धा जि. प. अकोला मधे सार्वत्रिक बदल्यांपूर्वी समायोजन व अचूक मॅपिंग न केल्याने संगणकीय प्रणालीद्वारे अनेक शाळांमध्ये मंजुर पदांपेक्षा ज्यादा शिक्षकांना पदस्थापना मिळाली त्यामुळे नाहकच अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली व त्यांना समायोजनाचा सामना करावा लागला. सन २०२०-२१ या चालू शैक्षणिक वर्षीसुध्दा विषय शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची मिळून शंभर पेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत व त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात साहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे बदल्यांसाठी मॅपिंग करत असताना सहाय्यक शिक्षकांची पदे अतिरिक्त दिसतात. याचा सरळ फटका आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना बसत असून त्यांचा स्वजिल्ह्यात येण्याचा मार्ग बंद होत आहे. तसेच जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये शिक्षकांवर विस्थापित होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. वारंवार होणाऱ्या या चुका टाळण्यासाठी तसेच शिक्षकांना व यंत्रणेला होणारा त्रास थांबविण्यासाठी यावर्षी सार्वत्रिक बदल्यांची सुरुवात होण्याआधी जिल्ह्यातील विषय शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी किंवा शिक्षकांचे बदल्यांसाठी मॅपिंग करतांना सदर रिक्त पदे ही सहायक शिक्षकांकरिता खुली करण्यात यावी. अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, वंदना बोर्डे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर, सचिन काठोळे, श्याम कुलट यांनी केली आहे.
शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांपूर्वी पदोन्नती प्रक्रिया राबवून अचूक मॅपिंग करण्याची शिक्षक परिषदेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:17 AM