- नितीन गव्हाळे
अकोला : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. केरळ व महाराष्ट्रात अद्यापही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसहशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. काही अपवाद वगळता, ९९ टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. परंतु अद्यापही शेकडो शिक्षकांनी कोरोना लसीकरण करून घेतले नाही. लसीकरणाबाबत शिक्षकांच्या मनातही काही गैरसमज पसरलेले असल्यामुळे अनेकांनी कोरोनाची लस घेतली नाही. काहींनी वेळकाढू धोरण स्वीकारल्यामुळे लस घेतली नाही. परंतु आता राज्य शासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोज घेण्याची सक्ती करीत, ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत डेडलाइन दिली आहे. तसे आदेशच शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस- १५९६२
दुसरा डोस-१५९६२
दोन्ही डोस न घेतलेले-१९६८
शासकीय शाळांतील शिक्षक- ४९६२
शासकीय शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी- ११६३
खाजगी शाळांतील शिक्षक- १२४६८
म्हणून नाही घेतली लस
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ९९ टक्के शिक्षकांचे कोरोनाचे दोन्ही डोज झाले आहेत. काही शिक्षकांचे लसीकरण राहिले आहे. तेही लवकरच पूर्ण होईल. अशी अपेक्षा आहे. कोरोना लसीकरणासाठी शिक्षक आग्रही आणि इच्छुक आहेत. परंतु काही कारणास्तव त्यांचे लसीकरण राहिले आहे.
- पुंडलिक भदे, मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा, कट्यार
आमच्या शाळेतील शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. इतर शाळांमधील केवळ १ टक्का शिक्षकांचे लसीकरण राहिले आहे. त्याला काही कारणे आहेत. परंतु लवकरच सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होईल. अशी अपेक्षा आहे.
- चेतन सरदार, शिक्षक, जि.प. केंद्रीय शाळा, दापुरा