राज्यात सद्य:स्थितीत १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांचे कोविड १९ लसीकरण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या आदेशानंतर आता राज्य शासनानेही राज्यातील सर्वच शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा व महापालिका शिक्षण विभागाकडून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यास जिल्हा पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
गरजेनुसार लसीकरण केंद्र राखीव
कोविड लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या लसीकरण मोहिमेत गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गरजेनुसार लसीकरण केंद्र राखीव ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शासकीय, खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हास्तरावर माहिती संकलनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच लसीकरणाचे नियोजनही केले जात आहे. - डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला