अकोला : जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया शनिवारी जिल्हा परिषदेत निश्चित करण्यात आली होती; मात्र नियमानुसार समायोजनाची प्रक्रिया करण्याची मागणी करीत, नियोजित समायोजन प्रक्रियेला शिक्षकांनी विरोध केल्याने, अखेर जिल्हा परिषद शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३ जुलै रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया शनिवार, २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात ठरविण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्हा परिषद परिसरात शिक्षकांची गर्दी जमली होती; परंतु १८ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा हा कालावधी नसून, समायोजन करण्याचा कालावधी संपल्यामुळे २८ जून २०१९ रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार आणि ३० सप्टेंबर २०१९ रोजीच्या पटसंख्येनुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे शनिवारी ठरलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आता ३ जुलै रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले.शिक्षकांनी दिला ठिय्या!शनिवारी ठरलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला विरोध करीत आणि नियमानुसार समायोजन करण्याची मागणी करीत शिक्षक संघटनांच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. १८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषद अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेपूर्वी पदोन्नतीची कार्यवाही करणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा कालावधी संपल्यामुळे ३० सप्टेंबर २०१९ च्या पटसंख्येनुसार समायोजन करण्यात यावे, अशी मागणी करीत नियमबाह्य समायोजन स्थगित करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानुषंगाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर शिक्षकांचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड, महाराष्ट्र शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रजनीश ठाकरे, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष केशव मालोकार, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. एन. मेश्राम यांच्यासह पुरोगामी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष महल्ले, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय भाकरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
यादीवर १ जुलैपर्यंत मागितले आक्षेप!जिल्हा परिषद अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी समायोजनास पात्र अतिरक्त शिक्षकांच्या यादीवर सोमवार, १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून, मंगळवारी आक्षेपांची छाननी व सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर ३ जुलै रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.