अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच बिंदुनामावली विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आली.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बिंदुनामावलीचे काय झाले, असा प्रश्न समितीच्या सदस्य आम्रपाली खंडारे यांनी सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने या विषयावर झालेल्या चर्चेत बिंदुनामावली तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच बिंदुनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
तसेच शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या मुद्दयावरही या सभेत सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सिंगव्दारे घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य वर्षा वजिरे, गणेश बोबडे, रंजना विल्हेकर, पवन बुटे, रिजवाना परवीन शे. मुख्तार, आम्रपाली खंडारे, रामकुमार गव्हाणकर, प्रगती दांदळे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
ठोकबर्डी येथील शाळेसाठी एक शिक्षक नियुक्त करणार!
अकोट तालुक्यातील ठोकबर्डी येथील बंद करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेची चाैकशी करण्यात आली असून, चाैकशी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी या शाळेवर एक निरीक्षक नियुक्त करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या.
सर्व शाळांमध्ये ‘स्काउट गाइड’!
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये स्काउट गाइड कब बुलबुल उपक्रम सुरू करण्याचा मुद्दा सदस्य रामकुमार गव्हाणकर यांनी सभेत मांडला. त्यानुषंगाने या मुद्द्यावर सभेत चर्चा करण्यात आली व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.