अकोला: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या निवडक प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षकांसाठी पुन्हा १४ नोव्हेंबरपासून अविरत आॅनलाइन प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.दुसºया टप्प्यातील आॅनलाइन प्रशिक्षणासाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छिणाºया शिक्षक, मुख्याध्यापकांनी अविरत अॅप अपडेट करून घ्यावे, जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, विद्यार्थी कॉन्व्हेंट संस्कृती सोडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळले पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्रत्येकी दोन शिक्षकांना आॅनलाइन अविरत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांकडून शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित काही विषयांचे प्रश्न, काही प्रयोग देण्यात येतात. त्यांची सोडवणूक केल्यानंतर शिक्षक पुढील टप्पा गाठतात. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातून ९४४ शिक्षकांनी अविरत प्रशिक्षण पूर्ण केले होते. आता १४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत दुसरा टप्पा पार पडणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रश्न किंवा विधानाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिक्षकांनी काळजीपूर्वक वाचन करावे, टप्पा एकप्रमाणे टप्पा दोनमध्येसुद्धा काही नकारात्मक विधाने आहेत. त्यामुळे आॅनलाइन प्रशिक्षणादरम्यान महत्त्वाच्या मुद्यांची नोंद ठेवावी, यावेळी प्रकल्प (उपक्रम) स्वतंत्र अपलोड करायचा नाही. त्यासाठी आॅनलाइन प्रशिक्षण चालू असतानाच टेक्स बॉक्समध्ये लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिक्षकांनी इंग्रजीत लिहिले तरी हरकत नाही. मराठीत लिहायचे असल्यास ‘प्ले स्टोअर’मधून ईजी मराठी टायपिंग अॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.