अकोला : आदिवासी विदयार्थी दुर्गम भागात व मागासलेल्या भागातून येत असतो त्या विदयार्थ्यांना चांगले शिक्षण , नेतृत्व कुशलता उत्तम संस्कार देवून चांगला नागरीक घडवून समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास , दुरसंचार , इलेक्ट्रानिक्स, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.
आदिवासी प्रकल्प विभागाने जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत केलेल्या आदिवासी आश्रम शाळेतील मुख्यध्यापक , शिक्षक व अधिक्षक यांच्या एकदिवसीय उदबोधन – प्रबोधन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांची प्रमुख् उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना धोत्रे पुढे महणाले की, आदिवासी विदयार्थ्यांमध्ये मेहनत , समाधान व चिकाटी हे गुण उपजतच असतात. या गुणांना व्यवस्थीत पैलू पाडून त्यांना संधी व प्रशिक्षण देण्याचे काम आपल्या विभागाकडून होत असते. आदिवासी विभागाचे काम उल्लेखनीय असुन या विभागाने आपल्या कामासोबत समाज प्रबोधनाचे काम करत राहावे असेही त्यांनी सांगितले.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास प्रकलपाचे प्रकलप अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी केले. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत शिक्षक विदयार्थी सहसंबंध या विषयावर प्रशांत भटकर, व्यक्तीमत्व विकास या विषयावर सुमित उरकुडकर, शालेय कामकाजाबरोबर विविध कृतीयुक्त उपक्रम या विषयावर पुरूषोत्तम आवारे , विदयार्थांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षकांची भुमिका या विषयावर यजुर्वेद महाजन, तनावमुक्त जीवन व संभाषण कौशल्य या विषयावर नरेंद्र काकड, विदयार्थ्यांची आरोग्याची काळजी डॉ. जाधव आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अकोला, वाशिम , बुलढाणा, या जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील मुख्यध्यापक , शिक्षक व अधिक्षक यांची उपस्थिती होती.