अकोला: महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असल्याचे चित्र आहे. यादरम्यान महापालिकेने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी नियुक्त होणे अपेक्षित असताना मनपाच्या काही शिक्षकांनी कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. लॉकडाउनमुळे पातूर, बाळापूर, खामगावात अडकून पडल्याची तसेच इतर सबबी पुढे करणाऱ्या २३ शिक्षकांना महापालिकेने नोटीस बजावल्याची माहिती आहे.शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागातील वसुली लिपिक, शिक्षक तसेच आशा वर्कर यांची नियुक्ती केली. यादरम्यान शिक्षण विभागात कार्यरत मराठी तसेच उर्दू माध्यमातील अनेक शिक्षकांनी कर्तव्याकडे पाठ फिरवत लॉकडाउनमुळे पातूर, बाळापूर तसेच खामगाव शहरात अडकल्याच्या हास्यास्पद सबबी समोर केल्याची माहिती आहे. यातील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तांदूळ वाटपामुळे कर्तव्यावर हजर होऊ शकलो नसल्याच्या सबबी पुढे केल्या आहेत. अशात कामचुकार शिक्षकांमुळे कोरोना विषाणूचा मुकाबला करणाºया इतर शिक्षकांच्या मनोधैर्यावर परिणाम होणार नाही, ही बाब लक्षात घेत महापालिका प्रशासनाने अशा २३ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.दांडीबहाद्दर शिक्षकांची पाठराखण!कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेचे शिक्षक तसेच आशा वर्कर जीव धोक्यात घालून सर्वेक्षण तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी करीत आहेत. अशावेळी कर्तव्याकडे पाठ फिरवणाºया काही दांडीबहाद्दर शिक्षकांची शिक्षण विभागाकडून पाठराखण केली जात असल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकाराकडे आयुक्त संजय कापडणीस लक्ष देतील का, असा सवाल कर्तव्यावर हजर शिक्षकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.२० मार्चपासून कर्तव्यावर हजर असणाºया तसेच अनुपस्थित असणाºया सर्व शिक्षकांची माहिती घेतली जाणार आहे. अशा संकटसमयी विविध कारणांचे दाखले देत कर्तव्यावरून पळ काढणाºया शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल, हे निश्चित.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.