अकोला तालुक्यातील दापुरा केंद्रातील शिक्षकांनी केंद्रप्रमुख श्रीकृष्ण गावंडे यांच्या पुढाकारातून कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शिक्षक व त्यांच्या नातेवाइकांसाठी अन्नपेढी सुरू केली. ज्या शिक्षकांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा नातेवाइकांना कोरोनाची बाधा झाली आणि कुटुंबातील सदस्य रुग्णालयात भरती आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नाही. अशा शिक्षक कुटुंबीय व नातेवाइकांसाठी मोफत जेवणाचा डबा पुरविण्याचा प्रेरणादायी उपक्रम शिक्षकांनी सुरू केला आहे. शिक्षकीपेशासोबतच दु:खी, पीडितांच्या तोंडी अन्नाचे दोन घास खाऊ घालण्याच्या या उपक्रमाला शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या अन्नपेढीसाठी शिक्षक वर्गणी गोळा करून आपल्या सहकारी शिक्षकांना मदतीचा हात देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद तर आहेच, शिवाय प्रेरणादायीसुद्धा आहे.
फोटो:
जेवणाच्या डब्यासाठी करावी नोंदणी
आदल्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत शिक्षकांकडे भागनिहाय नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या हॉस्पिटलमध्ये शिक्षक कुटुंबातील किंवा नात्यातील रुग्ण भरती आहेत, त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना जेवणाचा डबा उपलब्ध करून दिला जाईल. केंद्रप्रमुख श्रीकृष्ण गावंडे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे जिल्हाभरातील शिक्षकांकडून कौतुक होत आहे.
डब्यासाठी यांच्याशी साधावा संपर्क
जवाहर नगर- आशा श्रीकांत पाटील पिसे, जठारपेठ- श्रीकृष्ण गावंडे, कौलखेड- सौ. वंदना चव्हाण, खडकी- नयना जुमळे/कळंबे, उमरी-पुंडलिक भदे, डाबकी रोड- नंदकिशोर इंगळे, देशमुख फैल- अनिता खैरनार, मलकापूर कोठारी वाटिका- सविता खिल्लारे, बाळापूर रोड- शब्बीर अहमद आदी शिक्षकांशी संपर्क साधावा.