अकोला, दि. १0 : शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील मुलगा जिल्हाधिकारी बनू शकला; परंतु गत काही वर्षांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जागविण्यासाठी शिक्षकांनी कार्य केले पाहिजे. सर्वांनाच डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे; परंतु एकही विद्यार्थी वैज्ञानिक बनण्यासाठी तयार होत नाही, हे शिक्षकांचे अपयश आहे. अशा शब्दात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शिक्षकांच्या अध्यापनाविषयी नाराजी व्यक्त केली आणि शिक्षणाधिकार्यांना इशारा करून, जे विज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यात कुचराई करत असतील, त्यांचे पगार बंद करा, अशी सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी केली. मेहरबानो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनाचा बुधवारी दुपारी समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, परम संगणक निर्माते डॉ. विजय भटकर हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जगविख्यात झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या गुरूचेही नाव घेतल्या जाते. आपल्या विद्यार्थ्यांसोबत आपलेही नाव समाजाने घ्यावे, यासाठी विद्यार्थ्यांना घडवा. त्यांच्यातील संशोधक शोधा, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. पुढील वर्षी प्रत्येक शाळा, शिक्षकाने इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांंची नावे नोंदवावीत, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या १६४ शाळांमधून १६ शाळेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांंना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सीईओ अरूण विधळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
शिक्षकांच्या अध्यापनाविषयी जिल्हाधिका-यांची नाराजी!
By admin | Published: August 11, 2016 1:46 AM