अकोला: अकोल्यातील काही नामांकित शिकवणी वर्ग बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे पत्र अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाले आहे. सीमी आणि इंडियन मुजाहिदीन या संघटनांच्या नावे प्राप्त झालेल्या या धमकीपत्रानुसार पोलिसांनी शिकवणी वर्ग संचालकांना सतर्क केले असून, या प्रकारामुळे शिकवणी वर्ग संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शहरातील तोष्णीवाल लेआऊट परिसरात असलेले शिकवणी वर्ग बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याचा सीमी आणि इंडियन मुजाहिदीन नामक दहशतवादी संघटनेचा बेत असल्याचे एक पत्र अजीज खान नामक व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयास काही दिवसांपूर्वी पाठविले होते. या पत्रामध्ये तोष्णीवाल लेआऊटमधील नामांकित शिकवणी वर्ग आणि त्यांच्या संचालकांच्या नावांचासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे. पोलिसांनी या पत्राची दखल घेतली असून, यासंदर्भात शिकवणी वर्ग संचालकांना सिव्हिल लाइन पोलिसांनी सतर्क केले आहे. शिकवणी वर्ग परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसी कॅमेर्यांची रेकॉर्डिंंग दररोज तपासणे, तसेच विद्यार्थ्यांंच्या बॅगसुद्धा तपासण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अनोळखी इसम परिसरात फिरताना किंवा कोणतीही आक्षेपार्ह हालचाली करताना दिसून आल्यास तत्काळ माहिती देण्याचे पोलिसांनी सुचविले आहे. साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बॉम्बद्वारे शिकवणी वर्ग उडविण्यासंदर्भातले एक धमकी पत्र पोलिसांना प्राप्त झाले असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यामुळे सिव्हिल लाइन पोलिसांनी शिकवणी वर्ग संचालकांना पत्र पाठवून सतर्क राहण्यासोबतच उपाययोजना करण्यास सुचविले, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
*खोडसाळपणाचा संशय!
इिंडियन मुजाहिदीन किंवा सीमीला अकोल्यातील शिकवणी वर्ग आणि संचालकांची नावे कशी माहिती झाली आणि त्यांनी शिकवणी वर्गांंंनाच का टारगेट केले, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे शहराची शांतता भंग करण्याच्या दृष्टिने, किंवा खोडसाळपणातून कुणीतरी हे धमकीपत्र पाठविले असावे, असा पोलिसांना संशय आहे.