संतोषकुमार गवई
पातूर: पातूर तालुक्याच्या पूर्व भागातील खानापूर, आष्टुल आणि पाष्टुल महसुली जंगलातून सागवानासह इतर वृक्षांची अवैध वृक्षतोड वाढली आहे. या परिसरातील सागवानाची तस्करी केली जात असल्याने पातूरचे वनवैभव धोक्यात आले आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पातूर तालुक्याला वनवैभव लाभले असून, पूर्व भागात मोर्णा धरण आहे. या नजीकच पाष्टुल, आष्टुल आणि खानापूर अशी गावे आहेत. गावांच्या पश्चिमेस महसुली टेकड्या आहेत. या टेकड्यांवर सागवानासह विविध प्रकारची घनदाट वृक्षसंपदा आहे. या भागातून सागवान वृक्षासह विविध जातीच्या वृक्षांची अवैध वृक्षतोड दिवसाढवळ्या सुरू असून, या लाकडांची वाहतूक दुचाकीद्वारा करण्यात येते. त्यामुळे स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींमध्ये रोष व्यक्त होत आहे. महसुली टेकड्यांवरील वनसंवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याची माहिती आहे; मात्र ग्रामपंचायतीकडे कुठलीही यंत्रणा नसल्याने लाकूड चोरटे सक्रिय झाले आहेत. पातूर वन परिक्षेत्र मेडशी (मालेगाव तालुका) वनपरिक्षेत्र आणि आलेगाव वनपरिक्षेत्र या ठिकाणी वनविभागाची यंत्रणा कार्यरत आहे; मात्र पाष्टुल, आष्टुल आणि खानापूर या महसुली टेकड्यांवरील घनदाट जंगलावर तस्करांची वक्रदृष्टी कायम आहे.
-------------------------
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. अवैध वृक्षतोडीमुळे पर्जन्यमान पातूर तालुक्याचे दरवर्षी घसरत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी.
-नंदू येनकर, पातूर.
-------------------------------
अवेैध वृक्षतोड सुरू असल्याने या संदर्भात वन विभागाला पत्र देऊन कळविण्यात येईल.
दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.
---------------------------
खानापूर, आष्टुल आणि पाष्टुल महसुली टेकड्यांवरील वृक्षतोड थांबवण्यासाठी वन विभागाची गस्त वाढवली जाईल.
डी. डी. मदने, आरएफओ, पातूर.
180821\img_20210817_133249.jpg
पातुरच्या महसुली जंगलातून सागवानाची तस्करी