- संजय खांडेकर
अकोला: गत काही महिन्यांपासून सेल्युलर मोबाइलचे कॉल ड्रॉप होत आहेत. ही समस्या सर्वच मोबाइल सेल्युलर कंपन्यांच्या ग्राहकांना भेडसावत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी डीओटी टर्म सेलची (डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम्युनिकेशन) टीम शोध घेत असून, ही टीम दोन दिवसांपासून अकोल्यात दाखल आहे. अकोला-वाशिम परिसरातील मोबाइल टॉवर्सची रेंज अत्याधुनिक मीटरने तपासून नेटवर्क तपासले जात आहे. यादरम्यान अतिरिक्त रेडिएशनचा वापर आढळल्यास त्या कंपनी टॉवर्सवर आणि आॅपरेटरवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.गेल्या काही दिवसांपासून कॉल ड्राप होण्याचे आणि कॉल न लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या काही जाणकारांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर धोत्रे यांनी याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली असून, अकोल्यापासूनच कॉलड्रॉपच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. डीओटी टर्म सेलचे नागपूरचे तज्ज्ञ पथक दोन दिवसांपासून अकोल्यात दाखल झाले असून, त्यांनी गुरुवारी तेल्हारा तालुक्यातील नेटवर्कची तपासणी केली. टेस्टिंग मीटर लावून मोबाइल टॉवर्सच्या क्षमतेची रेंज तपासली. ज्या ठिकाणी लेव्हल डाऊन आढळली तेथे ती उंचाविण्याच्या नोंदी घेतल्या गेल्यात. नागपूरच्या पथकाकडून तपासणी होत असल्याचे लक्षात येताच सक्रिय असलेल्या बीएसएनएलसह रिलायन्स, आयडिया-वडाफोन आणि एअरटेल या चारही कंपनीचे आॅपरेटर्स सतर्क झाले आहे.मोबाइल टॉवर्सच्या कमतरतेमुळे समस्यारिलायन्सने सुरू केलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे अनेक सेल्युलर कंपन्या बंद पडल्या. काही इतर कंपन्यांमध्ये मर्ज झाल्यात. टू-जीच्या तुलनेत फोरजीच्या टॉवर्सची संख्या वाढविणे गरजेचे असते; मात्र सेवा फोर-जीची आणि सिंग्नल टॉवर्स (टू-जी) कालबाह्य असल्याने सेवा विस्कळीत होत आहे. त्या अंगानेदेखील तपासणी सुरू आहे. गत दोन दिवसांपासून डीओटी टर्म सेलची टीम अकोल्यात आली असून, ते कॉलड्राप संदर्भातील रेंजची तपासणी करीत आहे. अकोला जिल्ह्यातील तपसणी झाल्यानंतर ते वरिष्ठांकडे त्यांचा अहवाल सादर करतील. याबाबत आम्हाला त्याची माहिती मिळत नसते.- पवनकुमार बारापात्रे, महाप्रबंधक, अकोला-वाशिम.