- संतोष येलकर
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये मंजूर असलेल्या कामांपैकी १ हजार ७९२ कामांना तांत्रिक मान्यता आणि २ हजार ६३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेअभावी अडकलेली जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात वारंवार निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील १४४ गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची ३ हजार १९३ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित कामांपैकी आॅक्टोबर अखेरपर्यंत २४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ३६४ कामे सुरू आहेत. उर्वरित १ हजार ४०१ कामांना तांत्रिक मान्यता आणि २ हजार ६३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया अद्याप बाकी असलेली जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ची कामे केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.८५ कोटींपैकी एक कोटी खर्च!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची विविध कामे करण्यासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी आॅक्टोबर अखेरपर्यंत केवळ एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित ८४ कोटी रुपयांचा निधी येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च होणार की नाही आणि उपलब्ध निधीतून कामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.