- संजय खांडेकर
अकोला : प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर निर्माण होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे आर्थिक वर्षाचा परतावा भरण्यात व्यत्यय येत आहे. एकीकडे परतावा भरण्याची मुदत जवळ येत असताना अनेकाना आॅनलाइन भरणाकरण्यासा अडचण जात आहे. या तांत्रिक बिघाडामुळे कर सल्लागार आणि करदाते कमालीचे त्रासले आहेत.प्राप्तिकर कार्यालयाने वार्षिक आर्थिक परतावा दाखल करण्याची तारीख वाढवून ३१ आॅगस्ट १८ केली आहे. परतावा दाखल करण्यात आला नाही, तर पाच हजार रुपये दंड आकारल्या जाण्याचा इशारा दिला जात असल्याने करदात्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. दंडापेक्षा परतावा भरून मोकळे होण्याच्या मनस्थितीत पोहोचलेले नागरिक कर सल्लागारांकडे पोहोचत आहेत. मात्र परतावा भरण्याच्या संकेतस्थळावर तांत्रिक बिघाडाचा सामना कर सल्लागारांना करावा लागत आहे. दिवसातून अनेकदा असे प्रकार घडत असल्याने कर सल्लागार कमालीचे त्रासले आहेत. अनेकांनी प्राप्तिकरच्या पोर्टलवरही यासंदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. संकेतस्थळाच्या सर्व्हर क्षमतेपेक्षा जास्त डेटा लोड होत असल्याने तर हे होत नाही ना, असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
-प्राप्तिकर परतावा दाखल करण्यासाठी आता केवळ दहा दिवस राहिले आहेत. दिवसांतून अनेक वेळा प्राप्तिकरच्या संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड येतो. त्यामुळे अनेक करदात्यांना परत पाठवावे लागते. परतावा दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाइन असल्याने दुसरा कोणताही पर्याय नाही.-अभिजित मुळे, कर सल्लागार, अकोला.
-प्राप्तिकर संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संकेतस्थळाच्या सर्व्हरची क्षमता आणि तांत्रिक अडचणींबाबत आम्हाला काहीही करता येत नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे कळविण्यात आले आहे.- अरविंद देसाई, संयुक्त आयुक्त, प्राप्तिकर विभाग, अकोला.