अकोला : बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदारास ५ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक निलेश कळसकर याच्यासह याप्रकरणात अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांना अटक करण्यात आली. तहसीलदार लोखंडे यांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अकोला तहसील कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला निलेश भास्कर कळसकर (वय ३२) याने बोरगाव मंजू येथील स्वस्त धान्य दुकानदाराने त्याच्या दुकानातून कोरोनाकाळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक निलेश कळसकार यास अटक केली होती. त्यानंतर कळसकर पोलीस कोठडीत असताना कसून चौकशी केली. या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे या लाचखोरी प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे यांना अटक केली. तहसीलदार लोखंडे यांचे नाव निलेश कळसकार याच्याकडून समोर आल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई करून तहसीलदार लोखंडे यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी तहसीलदार विजय लोखंडे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी लोखंडे यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.